जिल्हास्तरीत बालनाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0

महेश गोडगे

मोहोळ (प्रतिनिधी) : एलिझाबेथ एकादशी फेम पुष्कर लोणारकर या गुणी कलाकाराच्या उपस्थित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालयात आज मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. जिल्हा परिषद, सोलापूर आयोजित व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा अंतर्गत या बालनाट्य स्पर्धांचे नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग मोहोळ यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्या अनुषंगाने गरड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे उदघाटन प्रसिद्ध सिने कलाकार पुष्कर लोणारकर याच्या हस्ते करण्यात आले. जिल्हास्तरीय या स्पर्धांच्या उदघाटन प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती समता गावडे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, गरड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय तिकटे, सचिव प्रतापसिंह गरड, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत व विकास यादव यांच्यासह जिल्हाभरातून आलेले बालकलाकार व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते. या स्पर्धा मोठा गट व लहान गट अशा दोन गटात घेण्यात आल्या. मोठ्या गटात जि. प. प्राथमिक शाळा भालेवाडी (ता. मंगळवेढा) या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नजीक पिंपरी (ता. मोहोळ) व कवठे (ता. उ. सोलापूर) या शाळांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक देखील तुपेवस्ती (ता. माळशिरस) व खांडवी मुली (ता. बार्शी) या शाळांना विभागून देण्यात आला. यावर्षी लहान गटात प्रथम येण्याचा मान आढीव (ता. पंढरपूर) या शाळेस मिळाला. जिल्ह्यात बालनाट्य स्पर्धेत दबदबा असलेल्या मोहोळ तालुक्यातील खंडाळी शाळेस द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले तर सौंदरे (ता. बार्शी) या शाळेचा तृतीय क्रमांक आला. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून कन्या शाळेतील प्रा. अशोक पाचकुडवे, यावली हायस्कुलचे मुख्याध्यापक राजेंद्र वाकळे, प्रसिद्ध निवेदक प्रमोद कोरे, टाकळीचे परमेश्वर गायकवाड यांनी काम पाहिले. तर पंचायत समिती शिक्षण विभाग व गरड महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here