बहुजन विकास आघाडी म्हणजे गुंडांची टोळी : आदित्य ठाकरे

0

पालघर (योगेश चांदेकर):पालघर-मतदारसंघात असलेली निवडणुकीची मरगळ आज शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेने काही प्रमाणात दूर झाली. पालघर लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करताना बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली. बहुजन विकास आघाडी ही संघटना नसून गुंडांची टोळी असल्याचे सांगत ठाकुरांच्या महाआघाडीवर तोफ डागली. त्यामुळे येथील मतदारांना ठाकरे विरुद्ध ठाकूर द्वंद्व पहावयास मिळाले.

ठाकरे सभेला मार्गदर्शन करताना म्हणाले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णतेचा पारा चढला असला तरीही सर्वत्र भगवा रंगच पसरला आहे. त्यामुळे भगव्याच्या विजयासाठी सर्वांनी मतदान करा. राष्ट्रवादी म्हणजेच भ्रष्टवादी काँग्रेस झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात दुष्काळाचे सावट असून सातारा जिल्ह्यातील मान खटाव या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने विविध प्रकल्प व योजनांचा पैसा  खिशात घातला. राष्ट्रवादी काँग्रेसची निशाणी १० वाजून १० मिनिटे दर्शवणारे घड्याळाने सत्ताकाळात राज्याचे बारा वाजवले. त्यामुळे युतीला सत्तेची पहिली पाच वर्षे काँग्रेसचे पाप धुण्यासाठी लागली. युती सरकारने मेक इन महाराष्ट्रद्वारे रोजगार, रस्ते, यांस प्राधान्य देत दिलेली वचने पूर्ण केली आहेत. काँग्रेसने देशात अनेक  टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा, तेलगी कांड, इत्यादी घोटाळ्यांची मालिका केली. देशात महायुतीविरुद्ध अनेक पक्ष एकवटले असून हा सामना ५६ इंचाची छाती असलेले मोदी विरुद्ध ५६ पक्षाचे विरोधक अशी आहे. स्वर्ग सर्वाना पहायचा आहे पण मरायला कोणीही तयार नाही, अशी मल्लिनाथी देत ठाकरे यांनी विरोधी नेत्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षी स्वार्थी हेतुवर बोट ठेवले.

युवासेना प्रमुखांनी युतीची सत्ता आल्यास काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करणार असल्याचे सांगितले. तसेच देशद्रोहाच्या १२४ व्या कलमावर भाष्य केले. काँग्रेसचे सरकार आल्यास काश्मीर मध्ये स्वतंत्र राष्ट्रपती, स्वतंत्र झेंडा असेल. त्यामुळे देशाचा विचार करूनच मतदान करा व संपूर्ण देशात भगव्याला विजयी करा, अशी साद त्यांनी घातली.


ठाकुरांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष नसून संघटना आहे. बळीराम जाधव हे फक्त ८ वी शिकलेले असल्याने २००९ मध्ये विजयी होऊनही त्यांनी या भागातील जनतेच्या समस्यांबाबत संसदेत एकही प्रश्न विचारला नाही. कारण त्यांना हिंदी आणि इंग्लिश येतच नाही. तसेच त्यांनी खासदार असताना आपल्या नावाचे लेटरहेड ‘ अप्पा ‘ यांच्याकडेच ठेवले जात असल्याचे गुपित सांगितले. वसई विरार महानगरपालिका ही सर्वात भ्रष्ट असून बिल्डरांकडून प्रत्येक इमारती बांधकामासाठी प्रति चौरस फूट ३५० रुपये उकळलेले जात असल्याचे धक्कादायक विधान करून विरारकरांवर बोचरी टीका केली.

खान्देशी मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे सेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना सभा मंडपात येण्यास उशीर झाल्याने त्यांचे भाषण ऐकण्याच्या संधीस डहाणूकर मुकले. ठाकरे यांचे भाषण सुरु असताना ते येथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला.

२. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांची अनुपस्थित स्पष्टपणे दिसून आली. मात्र, श्रमजीवीचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, सुरेश रेंजड हे सभेस उपस्थित होते.

दुपारी २ वाजता सभा होती. तरीही जनतेने उन्हामध्ये पक्ष निशाणी असलेल्या टोप्या परिधान करून गर्दी केली होती.

या सभेला शिवसेनेचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, ज्योती ठाकरे, प्रभाकर राऊळ, डहाणू चे आमदार पास्कल धनारे, जिल्हा प्रमुख राजेश शहा, उपजिल्हाप्रमुख संतोष शेट्टी, विधानसभा संपर्कप्रमुख समीर सागर,  महिला आघाडी प्रमुख ज्योती मेहेर, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, डहाणू नगराध्यक्ष भरत राजपूत, युतीचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here