देशाच्या आंतराष्ट्रीय प्रतिमेस तडा देणारे ‘अयोध्याकांड’ भाकरीच्या प्रश्नास निकालात काढण्यासाठीच: ‘समाजवादी’च्या परिसंवादाचा सूर

0

 

मुरगुड (प्रतिनिधी) –
सर्वसामान्य जनता आणि करोडो तरुण,बेरोजगारांना मंदिरापेक्षा भाकरीचा प्रश्न महत्वाचा वाटतोय जमिनीवरील वास्तव आहे..पण सत्ता मिळवताना दिलेली आश्वासने सोडून देऊन अथवा त्यात आलेले अपयश लपवण्यासाठी ‘सबका साथ-सबका विकास, ‘अच्छे दिन वगैरेची भाषा बदलून “आत्ता नाही तर कधीच नाही “असा घोषा लावत आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न पद्धतशीरपणे नव्याने पुढे आणला जात आहे.आणि पुन्हा सर्वसामान्य लोकांच्या श्रद्धेचा,भावनांचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे,धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न करत धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्याचे चाललेले प्रयत्न म्हणजे सत्ताधाऱ्यांनी गेल्या साडेचार वर्षात देशाच्या आर्थिक,,सामाजिक आणि संस्कृतीक विकासाच्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आलेल्या अपयशाची कबुली आहे.म्हणूनच जगण्याच्या वास्तव प्रश्नांना बाजूला ढकलून भावनिक राजकारण केले जात आहे .सव्वाशे कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या धर्मनिरपेक्ष देशातील सुज्ञ जनतेने हे ओळखले पाहिजे आणि ती ते ओळखूनही आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित परिसंवादात व्यक्त करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘ राममंदिराचा प्रश्न आणि सद्यस्थिती ‘ या विषयावरील आयोजित परिसंवादात शुभम पाटील आणि सागर माळी यांनी मांडणी केली.अध्यक्षस्थानी शशांक बावचकर होते.प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रस्ताविक केले.
शुभम पाटील यांनी आपल्या मांडणीतून राममंदिर आणि बाबरी मशीद यांची गेल्या अनेक शतकांची ऐतिहासिक पार्श्वभूमी वस्तुनिष्ठपणे विषद केली.आणि पद्धतशीरपणे घडवून आणलेले आयोध्याकांड आणि त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोटापासून सुरू झालेल्या अतिरेकी दहशतवादी कारवाया आणि त्यामुळे देशाची झालेली अपरिमित हानी व आंतरराष्ट्रीय प्रतिमेला गेलेला तडा याची सूत्रबद्ध मांडणी केली.
सागर माळी यांनी घटना समितीचा स्थापना दिन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन या पार्श्वभूमीवर सध्या मंदिराचा प्रश्न ज्या पद्धतीने पुढे आणला जात आहे आणि सर्वोच्च न्यायालल्यावरही दबाव आणणारी विधाने केली जात आहेत याचे विवेचन केले. बदलत्या जागतिक राजकारणाचे व अर्थकारणाचे संदर्भ देत सत्ताधाऱ्यांची संकुचितता खऱ्या प्रश्नांपासून कशी बाजूला जाते आहे हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट केले.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना नगरसेवक शशांक बावचकर यांनी राममंदिर व बाबरीमशीद प्रश्नावर गेलीे तीन दशके जे धर्मांध राजकारण केले जात आहे व त्यातून राज्यघटनेतील मूल्यांना कसे तडे दिले जात आहेत व त्यापासून करकर्त्यांनी काय बोध घेतला पाहिजे याचे विवेचन केले.यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे,प्रा.रमेश लवटे,पांडुरंग पिसे,तुकाराम अपराध,अशोक केसरकर, रणजित यादव,प्रेमजीत बत्ते,नौशाद शेडबाळे,बापूसाहेब भोसले,नारायण लोटके,बाळकृष्ण म्हेत्रे, शंकरराव भांबिष्टे, मनोहर जोशी,श्रीधर शिंदे,शकील मुल्ला,राजू झळके,अरुण कुपेलूर,सोमेश गुरव मयुरेश माळी, वसंत पुजारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.सचिन पाटोळे यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here