अब्बा में नही आऊंगा मेरा गॅदरिंग प्रॅक्टिस चल रहा है….छोटया अय्यानची एक्झिट चटका लावणारी

0

अब्बा में नही आऊंगा मेरा गॅदरिंग प्रॅक्टिस चल रहा है….अय्यानचा हट्ट पुरवला असता तर वेळ टळली असती….
मुरगुड मध्ये शोकसभा…मृतांना आदरांजली
मुरगुड प्रतिनिधी
व्हॉलीबॉलपट्टू दिलावर बापुसाहेब जमादार व कुटुंबियांच्या दुर्दैवी व वेदनादायक अपघाती मृत्यूचे सावट मुरगुड शहरावर आजही व्यापून राहिले.संपूर्ण शहराने अभूतपूर्व दुखवटा पाळला कोणताही व्यवहार दिवसभर झाला नाही. सायंकाळी विश्वनाथराव पाटील खुल्या सभागृहात मुरगुड व्यापारी असोसिएशन आणि मुरगुड पत्रकार फौंडेशनने शोकसभा घेतली.शोकसभेत विविध क्षेत्रातील त्यांच्या सहकारी मित्रांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.आठवणींवर आठवणी गहिवरलेले स्वर आणि कातर आवाजाने अक्षरशः सभागृह हेलावून गेले.
निपाणी जवळ तवंदी घाटात झालेल्या अपघातात दिलावर जमादार,(वय 64) पत्नी रेहान दिलावर जमादार (वय 58) मुलगा डॉ.मोहसीन दिलावर जमादार (36),सून आफरीन मोहसीन जमादार(30) नातू अय्यान मोहसीन जमादार (5)आणि जुनेद दिलावर जमादार(28) या एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.जुनेदच्या मुलीच्या बारश्यासाठी सर्वजण आनंदात आपल्या कार मधून चालले असताना एका भरधाव ट्रकने या कुटुंबाचा वेध घेतला आणि सर्वच नष्ट झाले.
दिलावर यांचा नातू अय्यान एलकेजी मध्ये शिकत होता त्याचा गॅदरिंगसाठी सराव सुरु होता सराव सॊडून तो बारशाच्या कार्यक्रमास सांबरा(बेळगाव)येथे जाण्यास तयार नव्हता.शाळेतही त्याने आपल्या आजोबांना तसेच सांगितले.पण त्याचा तो बालहट्ट पूर्ण झाला नाही समजूत काढून त्यालाही नेण्यात आले आणि काळाने संधी साधून घातलेल्या घावात सर्व संपले. या दुर्दैवी घटनेने अय्यानचे शिक्षक शिक्षिका हादरून गेले आहेत.त्याची ही आठवण सांगताना न्यू इंग्लिश स्कुलचे व्ही आर भोसले यांना भावना अनावर झाल्या.त्याच्या वर्गातील चिमुकली अय्यान केंव्हा येणार त्याचे डिजिटल फलक का लावलेत असा प्रश्न विचारत आहेत.
या घटनेने मुरगुड मध्ये एकच सन्नाटा आहे. रविवारी होणारी मार्केटची वर्दळ पूर्ण थंडावली होती.शोकसभेत दिलावर जमादार यांचे व्हॉलीबॉल क्षेत्रातील कामगिरी, शालेय दिवस, त्यांचे निगर्वी, दिलखुलास मिश्किल व्यक्तित्व, त्यांचे विनोद, कोट्या सांगताना लोक गहिवरले, भावनाविवश झाले.जुनेदची कार सेल्स विभागातील कामगिरी,डॉ.मोहसीन यांच्या सारख्या सुशील आणि संस्कारी मितभाषी सेवाभावी डॉक्टरने अल्पावधीतच मुरगुड पंचक्रोशीत आपले नाव कमावले.केवळ पैसा व व्यवसायी दृष्टी न ठेवता समाजासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करणारा ध्येयवादी डॉक्टरच्या आठवणी सांगताना लोकांचे डोळे पाणावले.मोहसीन,जुनेद आणि अय्यान यांच्यावर सौ.रेहाना यांचे संस्कार होते त्यामुळे ही मुले आपल्या विनयशीलतेने सर्वांच्या लक्षात राहतील अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. नियतीच्या खेळाने एका समाधानी, सुसंस्कृत कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाला हे कोणालाच सहन होत नाही.

थांब जुनेद थांब ….पुढे धोका आहे….
अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहणे जुनेदच्या मित्रांना सहन होत नाही.अपघातापूर्वी काही क्षण एक कार आणि एक मोटर सायकल पास होताना दिसते पण त्यापाठोपाठ जुनेद चालवत असणारी कार मात्र या क्रूर नियतीने ट्रक खाली चिरडत शंभर मीटर अंतरापर्यंत नेली आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा नुकत्याच उमलू पाहणाऱ्या निष्पाप अय्यानरुपी कळीसह घास घेतला. हा प्रसंग सांगताना तो व्हिडीओ मध्येच थांबवून जुनेदला थांबण्यास सांगता आले असते तर…जुनेद आज सोबत असता असे सोमनाथ येरनाळकर यांनी सांगीतले तेंव्हा सभागृह गहिवरून गेले. जमादार कुटुंबियांपैकी जुनेदची पत्नी निशात आणि तीन महिन्याची मुलगी असे दोनच सदस्य राहीले आहेत.

अय्यानचा बाल हट्ट पुरवला असता तर…?त्याचे अम्मी,अब्बू,चाचु,बडे अब्बा बडी अम्मी सर्वच सलामत असते….सर्वसाक्षी परमेश्वर,राम,राहिम, खुदा,जिजस कोणत्याही नावाने आपण बोलावतो त्या ‘सर्वांचं भलं’ करणाऱ्या विश्वरूढ ताकदीवर क्रूर नियतीच भारी ठरली …अशी दुःखद भावनाही आज दिवसभर व्यक्त होत होत्या.

मुरगुड ता कागल येथील अपघाती मृत्यू झालेल्या दिलावर जमादार कुटुंबातील सहा सदस्यांना शोकसभेत आदरांजली वाहण्यात आली

खिलाडूवृत्ती आणि धर्म जाती सलोख्याने राहणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व दिलावर जमादार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या भोसले कॉलनी येथील निवासस्थाना समोरील परिसरास ‘दिलावर चौक’ असे नाव द्यावे अशी मागणी नागरिकांनी शोकसभेत केली. शोकसभेत महादेव कानकेकर, गजाननराव गंगापूरे,जोतिराम सूर्यवंशी, दगडू शेणवी,संतोष भोसले,शंकर रावण,महादेव खराडे,धोंडीराम परीट शिंदे,एम.डी.रावण,विशाल भोपळे,विकी साळोखे,सुधीर खाडे यांनी मनोगत व्यक्त केले. निवेदन अनिल पाटील यांनी कृतज्ञता मोहन गुजर यांनी व्यक्त केली.

मुरगुड मध्ये कडकडीत बंद पाळून शोक व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here