26 नोव्हेंबर पासून भूकंपाबाबत जनजागृतीसाठी प्रशिक्षण

1

पालघर-योगेश चांदेकर

पालघर-आज दि. 24 नोव्हेंबर 2018 रोजी डहाणू व तलासरी भागात दुपारपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. त्यातील दुपारी 3.15 वाजता बसलेला धक्का हा 3.3 मॅग्निट्युडचा आहे. पालघर जिल्ह्यात साधारणत: 6 मॅग्निट्युडचा धक्का बसल्यास काळजी करण्याचे कारण असेल. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. भूकंपाच्या अनुषंगाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्यामार्फत 26 नोव्हेंबर पासून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यावेळी सर्व नागरीकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

डहाणू व तलासरी तालुक्यांतील गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यास भूकंपादरम्यान, भूकंप झाल्यानंतर आणि भूकंपाच्या आधी कोणती काळजी घ्यावी, या विषयांवर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे :

धुंदलवाडी, धुंदलवाडी आश्रमशाळा साठी जि.प.शाळा पाटीलपाडा येथे 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तर हळदपाडा मधील ग्रामपंचायत कार्यालय येथे दुपारी 2 वाजता प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी वरखंडे, दापचरी, खुबारे या गावांसाठी कार्डिनल पेमेंटो हायस्कुल वरखंडे येथे सकाळी 11 वाजता तर नरेशवाडी, ब्राम्हणवाडी, पारडी आणि वंकास या गावांसाठी के.जे.टी.सोमय्या हायस्कुल नरेशवाडी येथे दुपारी 2 वाजता हे प्रशिक्षण देण्यात येईल. सवणे आणि वडवली साठी पंचायत समिती तलासरी येथे 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तर तलोठे, पुंजावे, सासवंद, चिंचावे साठी ग्रामपंचायत कार्यालय तलोठे येथे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आणि धामणगाव, गांगणगाव, जितगाव साठी गांगणगाव अाश्रमशाळा येथे दुपारी 2 वाजता या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणासाठी संबंधित गावातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच व इतर सर्व संबंधित पदाधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व इतर सर्व स्थानिक शासकीय प्रतिनिधी, परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक अथवा त्यांचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित सर्व व गावातील नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. जाणीव जागृती तर खूपच महत्वाची आहे।याचं बरोबर शासनाकडून याभागात भूजल व भूकंप संदर्भ तज्ज्ञांना पाचारण करून यंत्रणा कार्यान्वित करून केंद्रबिंदू निश्चिती आणि सुविधा निर्मिती,पर्याय निर्माण करणे।
    यासोबतच नुकसान झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून नोंद घेणे गरजेचे आहे।कृपया व्हावे।
    वसंत भसरा
    सामाजिक कार्यकर्ता
    डहाणू तलासरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here