बोपले शाळेत बालआनंद बाजार

0

महेश गोडगे

मोहोळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपले (ता .मोहोळ) येथे बालआनंद बाजार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या विद्यार्थी बालआनंद बाजाराचे उदघाटन शिक्षणप्रेमी नागरिक पंडित ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी या बाजार विषयी माहिती देताना, विद्यार्थ्यांना या उपक्रमातून पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञान व्हावे, स्वयंनिर्मितीचा आनंद मिळून समाजसहभागातून मूल्यशिक्षणाचे पाठ विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी या बालआनंद बाजाराचे आयोजन केले असल्याचे मुख्याध्यापक आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले.

             या बालआनंद बाजारात शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. मुला-मुलींनी स्वतःच्या शेतातील फळे, भाजीपाला, धान्य यांसह पालकांच्या मदतीने तयार केलेले विविध खादयपदार्थ विक्रीसाठी आणले होते. काही विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य, जीवनावश्यक वस्तू, स्वच्छता साधने, किराणा तसेच मिठाईचे स्टॉल ही थाटलेले पाहून ग्रामस्थ कुतूहलाने पाहत खरेदी करत होते. आठवडा बाजारात असणारी घाईगर्दी, गोंगाट, जोराचे पुकार येथेही अनुभवयाला मिळाले. विद्यार्थी विक्री झालेल्या नोंदी वहीत ठेवत होते तर उसंत मिळताच इतर स्टॉल वर जाऊन स्वतःसाठी काही खरेदी करत होते.

            या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परिसरातील गरजा, उत्पादित वस्तू, मागणी पुरवठा, नफा-तोटा, मांडणी, स्वच्छता, स्वयंशिस्त इत्यादी गोष्टींचे ज्ञान मिळत असून शिक्षणाबद्दल गोडी निर्माण होते. बालआनंद बाजारात सुमारे पाच हजाराच्या पुढे व्यवहार झाला असे आनंद होनराव म्हणाले. तर, बालआनंद बाजारामुळे आमच्या ज्ञानात वाढ झाली असून आम्हाला खूप आनंद झाला असे मत गणेश करंडे, समर्थ सरपाळे, कुणाल ढेरे, करिश्मा पवार, सुलोचना यमगर, सीमा लंगर, सोनाली करंडे, वैभव पूजारी, विकी मळगे या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ कदम, प्रमोद खरटमल, तुषार साठे, अमोल गावडे, अश्विनी मिटकरी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here