सर्व रस्त्यांची कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ

0

प्रतिनिधी आजरा
राज्य शासनाने राज्यभर रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. त्यामुळे राज्यात मार्चनंतर एकही रस्त्याचे काम शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा शुभारंभ व पूर्ण झालेल्या कामांच्या उद्घाटनासाठी ते शुक्रवारी तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रस्थाविकात आजरा कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी आजरा शहराच्या नव्या पाणी योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शिवाय आजरा – गडहिंग्लज हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होत नाही. या मार्गावरील वाहतुकीचा भार पाहता या मार्गाच्या दोन्ही बाजूला दोन फूट रुंदी वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी त्यांनी केली.


राधानगरी – भुदरगड व आजरा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ५५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आजरा तालुक्यातील ज्या कामांची मागणी आपल्याकडे झाली त्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आणखी नव्याने काही कामे असतील तर ती कामे सुचवा. अशोक चराटी यांच्याकडे या कामांची लिस्ट द्या. त्या कामांसाठीही शासन निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भाजपचे कार्यकर्ते प्रा. सुधीर मुंज त्यांच्या मातोश्रींचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या घरी जाऊन प्रा. मुंज यांचे पालकमंत्री पाटील यांनी सांत्वन केले. सकाळी ८.३० वाजता बुरूडे येथील पुल व दलितवस्तीतील कामांचा शुभारंभ केला. त्यानंतर सीडफार्मवरील जनसुविधा केंद्राचे उद्घाटन, आजराशहरातील सुतार गल्लीतील विहीर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर गांधीनगर येथील क्रीडांगण कामाचा शुभारंभ, आंबोली – आजरा – गडहिंग्लज – संकेश्वर रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर आजरा सूतगिरणीवरील जनसुविधा केंद्राचे उद्घाटन करून मंत्री पाटील पुढील कामांच्या उद्घाटनासाठी उत्तूरच्या दिशेने रवाना जाहले, यामध्ये आर्दाळ, हालेवाडी, वडकशिवाले ग्रामसडक योजनेतील रस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, भाजप तालुकाध्यक्ष अरुण देसाई, मलिककुमार बुरुड, विलास नाईक, विजयकुमार पाटील, नाथ देसाई, आजरा कारखाना संचालक दशरथ अमृते डॉ. अनिल देशपांडे, तहसीलदार अनिता नाईक, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांच्यासह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांचा ताफा रोखण्याचा धरणग्रस्तांचा प्रयत्न .
गांधीनगर येथे चित्रींसह तालुक्यातील उचांगी, आंबेओहोळ व सर्फनाला धरणातील धरणग्रस्तांनी मंत्री पाटील यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धरणग्रस्तांना रोखले. यानंतर धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेऊन धरणग्रस्तांच्या प्रश्नांची माहिती दिली. या विभागाच्या प्रांताधिकाऱ्यांकडून पुनर्वसनाचे काम रखडले असून त्यांच्या पुनर्वसनाचे अधिकार काढून घ्या किंवा त्यांची बदली करा, अशी मागणी केली. सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे पाटील यांनी सांगितले. पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत येत्या पंधरा दिवसात बैठक घेण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here