दादा पाटलांच्या वाड्यावर अजित पवार,उदयनराजेंची हजेरी

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार उदयन राजे भोसले यांनी चंद्रकांत दादांच्या दालनात हजेरी लावली

0

सुरेश ठमके

भाजपाचे वजनदार नेते आणि  मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या दिग्गज मराठा नेत्यांनी हजेरी लावल्याने मंगळवारी एकच खळबळ उडाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभाअध्यक्ष दिलीप वळसे पाटील  आणि  खासदार उदयनराजे भोसले यांचा यात समावेश होता.  शासकीय कामासाठी ही भेट सांगितले जात असले तरी बंद दरवाजाआड नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नाही.

राज्य शासनातील  क्रमांक दोनचे नेते आणि वजनदार मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या दालनात आणि वाड्यावर मंगळवारी भलतीच गडबड होती. ही गडबड आहे की भानगड याचा उलगडा दिवसभर पत्रकारच काय त्यांच्या कार्यालयातील अंधिका-यांनाही लागला नसावा. कारणही तसेच आहे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार उदयन राजे भोसले यांनी चंद्रकांत दादांच्या दालनात हजेरी लावली. हे तीनही दिग्गज नेत्यांनी एकत्रितरित्या चंद्रकांतदादांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, तीनही मराठा नेते एकत्र येवून भेट घेणे हा योगायोग मानता येणार नाही. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी रात्री उशिराही चंद्रकांत दादांच्या वाड्यावर म्हणजेच शासकीय बंगल्यावर हजेरी लावून दादांशी एकांतात चर्चा केली. त्यामुळे या भेटीमागे नेमके काय गुपित आहे. याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here