“आजरा साखर”च्या अध्यक्षांच्या दालनाला कामगारांनी ठोकले टाळे

0

आजरा (प्रतिनिधी) :

कामगार तसेच शेतकरी देणी त्याचबरोबर आजरा साखर कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात शुक्रवारी कामगारांनी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी हे अनुउपस्थित राहिले. या कारणामुळे कामगारांनी कारखाना कार्यस्थळावरील अध्यक्षांच्या दालनालाच टाळे ठोकून निषेध नोंदविला. दरम्यान अध्यक्ष हे कारखाना कामकाजाबाबत गांभीर्याने वागत नाहीत. तसेच मागण्याबाबत नेहमी टाळाटाळ करित असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे. याचबरोबर मंगळवार (दि. २६) पर्यंत अध्यक्ष कारखाना कार्यस्थळावर उपस्थित न राहिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कामगार व अध्यक्ष यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

सन २०१८-१९ च्या गळीत हंगामच्या सुरूवातीपासून कामगार व संचालक यांच्यात संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. बुधवारी कामगारांनी अध्यक्षांची गाडी काढून घेतली. तसेच कारखान्यातून वाहतुक करणारे ट्रक आडवून ठेवले आहेत. यातून मार्ग निघावा यासाठी शुक्रवार सर्व संचालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जे संचालक उपस्थित राहणार नाहीत, त्या संचालकांच्या दारात बोंबमारो आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला. यामुळे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक सुनील शिंत्रे, आनंदा कुलकर्णी वगळता सर्व संचालक उपस्थित होते. प्रथमतः संचालक मंडळाशी कामगारांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यामध्ये अध्यक्षांच्या तक्रारीचा पाढाच वाचला. विविध देणी देण्याबाबत अध्यक्ष चराटी चालढकल करीत असल्याचे सांगितले. संस्थेबाबत कोणतेही गांभीर्य अध्यक्षांना नाही. तसेच पुढील हंगाम चालविण्यात ठोस धोरण संचालकांनी ठरवावे असे कामगारांच्या वतीने शिष्टमंडळांने सांगितले. तसेच प्रत्येक संचालकाने आपली भुमिका कामगारांपुढे मांडण्यास सांगितले.

यानंतर कामगार एकत्र जमले. प्रथमतः जर कारखाना हिताचा निर्णय अध्यक्ष व संचालक घेऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा, असा एकमुखी निर्णय कामगारांनी घेतला. यावेळी संचालक दिगबंर देसाई, मलिक बुरूड, दशरथ अमृते, जनार्दन टोपले, वसंत धुरे, सुनिता रेडेकर, श्रीमती अंजना रेडेकर, मारूती घोरपडे, विष्णूपंत केसरकर यांनी आपली भुमिका कामगारांसमोर मांडली. यावेळी सर्वच संचालकांनी सर्वांच्याच चुका झाल्या आहेत. त्यामुळे एकदम टोकाची भुमिका नको. एकत्र बसून तोडगा काढायला हवा. कारखाना आर्थिक अडचणीत आहे. यातून मार्ग निघायला हवा, अन्यथा प्रत्येक घटक देशोधडीला लागणार असल्याचे सांगितले. यातून मार्ग काढण्यासाठी कामगारांनी अध्यक्षांना मंगळवार (दि. २६) पर्यंतची डेटलाईन देण्यात आली आहे. या कालावधीत अध्यक्षांनी कामगारांच्या मागण्याबाबत योग्य तो तोडगा काढावा, अन्यथा त्यानंतर आंदोलन तीव्र करण्य‍ाचा इशारा दिला. त्याचबरोबर शुक्रवारच्या बैठकीला अध्यक्ष चराटी हे अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांच्या कारखाना कार्यस्थळावरील दालनाला कामगारांनी टाळे ठोकले.

दरम्यान याप्रकाराबाबत अध्यक्ष अशोक चराटी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, शेतकर्‍यांची प्रलंबित देणी देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेकडे कर्जप्रस्तावाबाबत बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर येथे भेटण्यासाठी आपण गेलो होतो. कामगारांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात संचालक मंडळाच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here