आजरा महाविद्यालयात नैसर्गिक खडकांचे प्रदर्शन

0

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा महाविद्यालयात भूगोल विभागामार्फत ”जागतिक भूगोल दिना”निमित्त विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे भूशास्त्राचे अभ्यासक, भुप्रेमी, खडक संकलक प्रा. अभिजित पाटील यांनी संकलित केलेल्या १०० पेक्षा जास्त अग्निजन्य , रूपांतरित, आगी गाळाचे खडक या गटातील स्फटिके, धातू-अधातू, खनिजे, जीवाश्म वालुकामय, पंकाश्म अशा प्रकारच्या खडकाचे प्रदर्शन व वैज्ञानिक शास्त्रीय माहिती देण्यात आले.

या खडक प्रदर्शनाचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. देशपांडे यांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी स्थानिक परिसरातील खडक, माती खनिजे यांचे निरीक्षण करून त्यांची शास्त्रीय माहिती संकलित करा असे आवाहन केले.

भूशास्त्र अभ्यासक व खडक संकलक प्रा. अभिजित पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून आपल्या देशामध्ये विविध प्रकारची खडके आढळतात. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खडकाची माहिती दिली जाते परंतु विद्यार्थ्यांना ते खडक प्रत्यक्षात पाहता येत नाहीत व हाताळण्यास ही उपलब्ध होत नाहोत. अशा प्रदर्शनातून ती पाहता, हाताळता व अनुभवता येतात. तसेच खडकाचे प्रकार जीवाश्म यांचा अभ्यास करून उत्क्रांती विविध स्वरूपाचे भूरूप परिवर्तने यांचा अभ्यास करता येतो. प्रत्येक देशाच्या प्रत्येक भागामध्ये वैशिष्ट्यपूर्ण व विभिन्न प्रकारची खडक संरचना दसून येते. त्याचा अभ्यास केल्यानंतर तेथील भौगोलिक व बहुस्तरीय रचना समजते. कालपरिवर्तनाचा अभ्यास करता येतो. अनेक ठिकाणी मौल्यवान धातू बनविणे अधातू व इंधन खनिजे आठळतात. त्याचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासात होत आहे, असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये भूगोल व भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, वातावरणशास्त्र आदी विद्याशाखांचे महत्व सांगून विद्यार्थांनी अशा बहुविध शास्त्रशाखा मध्ये करिअर करण्यासाठी खूप संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले, योगेश पाटील, प्रा. वासुदेव मायदेव, प्रा. रत्नदीप पोवार, प्रा. अशोक बाचूलकर. प्रा. मनोज पाटील यासह महाविद्यालयाचे व आजरा हायस्कुलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते.

सदर प्रदर्शनास आजरा तालुक्यातील आजरा हायस्कुल, रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर, अण्णाभाऊ इंग्लिश स्कुल, व्यंकटराव हायस्कुल, रोझरी इंग्लिश मीडिअम स्कुल, आजरा महाविद्यालयात ज्युनिअर व सिनिअर विभागातील विद्यार्थी तसेच नागरिक असे ३००० (तीन हजार) पेक्षा जास्त लोकांनी प्रदर्शनास प्रत्यक्ष भेट देऊन १०० पेक्षा जास्त विविध प्रकारच्या खडकांची माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here