न्यायालयाच्या दणक्यानंतर एस टी पुन्हा रस्त्यावर

0

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मध्यरात्री मागे घेण्यात आला आहे. या संपाविरोधातल्या जनहित याचिकांवर काल मुंबई उच्च न्यायालयालयात झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं हा संप अवैध असल्याचं सांगत संपकरी कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे तसंच राज्य सरकारला येत्या २२ डिसेंबरपर्यंत वेतनवाढीचा निर्णय घेऊन उच्च न्यायालयास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी काल रात्री संप मागे घेत असल्याचं, एका पत्रकाद्वारे जाहीर केलं. जयप्रकाश छाजेड, संदीप शिंदे, हनुमंत ताटे, मुकेश तिगोटे, आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचं हे पत्रक रात्री उशीरा जारी करण्यात आलं.
संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात परवा सोमवापर्यंत उच्चस्तरीय समिती स्थापन करून, ही समिती स्थापन झाल्याबाबत एस टी कामगार संघटनांना लेखी पत्राद्वारे कळवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.
या समितीत वित्त सचिव, परिवहन सचिव, परिवहन आयुक्त, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालकांचा समावेश असेल. ही समिती महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, तसंच विदर्भ एस टी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशीं चर्चा करेल.
या चर्चेतून येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम वेतनवाढ आणि २२ डिसेंबरपर्यंत संपूर्ण वेतनवाढीचा निर्णय घेऊन, त्यासंदर्भात उच्च न्यायालयास अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.
दरम्यान, राज्यातली प्रवासी वाहतुक सुरळीत ठेवण्यासाठी गृहविभागानं अधिसूचना काढून सर्व खासगी प्रवासी बस, शालेय विद्यार्थी वाहतुक बस, कंपनी कामगार वाहुतक बस यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली होती. मात्र हा संप मागे घेण्यात आल्यामुळे, आता ही अधिसूचना रद्द झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्यानं, दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांचे गेले चार दिवस हाल झाले.
दरम्यान, आज पहाटे पासून एसटी बस धावण्यास सुरूवात झाली आहे. औरंगाबाद बस स्थानकावरून पुणे, जळगाव, इंदुर आदी बस रवाना झाल्याचं स्थानक नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here