हल्ल्यानंतर अतिरेक्यांचा होता सिरियात पळून जाण्याचा बेत

जलसाठे व अन्नातून विषप्रयोग, तसेच मुंबई-औरंगाबादसह विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचाही जेरबंद करण्यात आलेल्या अतिरेक्यांचा कट होता.

0

मुंबई : जलसाठे व अन्नातून विषप्रयोग, तसेच मुंबई-औरंगाबादसह विविध भागांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचाही जेरबंद करण्यात आलेल्या अतिरेक्यांचा कट होता. या हल्ल्यानंतर ते ‘इसिस’च्या दलालाच्या मदतीने सिरियामध्ये पळून जाणार होते, अशी धक्कादायक माहिती त्यांच्या चौकशीतून निष्पन्न झाली आहे. राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
एटीएसने अटक केलेला जमान खुटेउपाड (३२) हा मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात फार्मासिस्ट म्हणून नोकरीला होता. तो थेट ‘इसिस’ म्होरक्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानेच प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये अ‍ॅसिटॉनचे विषारी मिश्रण बनविले होते. ते सार्वजनिक समारंभाच्या ठिकाणी जेवणात अथवा पाण्यात मोठ्या प्रमाणात मिसळून मनुष्यहानी करण्याचा त्यांचा कट होता. जमानने या सर्व बाटल्या सलमान सिराजउद्दीन खानकडे दिल्या. त्या हाताळताना त्याला हातात ग्लोव्हज आणि तोंडाला मास्क लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
मुंबईसह औरंगाबादच्या विविध भागांत विषारी पदार्थ आणि स्फोटकांचा वापर करून दहशतवादी हल्ला घडवायचा आणि हल्ल्यानंतर सिरियामध्ये पळून जाण्याचे त्यांनी ठरविले. तेथीलच एका दलालाने त्यांची सर्व व्यवस्थाही केली असल्याचेही समजते. जमानच्या सांगण्यावरूनच त्यांची रूपरेषा ठरत असल्याचे समजते. आॅगस्ट २०१८ ते २२ जानेवारी २०१९ दरम्यान ते हा कट मार्गी लावण्याच्या तयारीत होते. त्यापूर्वीच एटीएसने त्यांना बेड्या ठोकल्या. तसेच मुंबईत प्रजासत्ताक दिनासाठीही रूपरेषा आखल्याची माहिती समोर येत आहे.
अटक आरोपी
एटीएसने मजहर अब्दुल रशिद शेख (२१), मो. तकी उर्फ अबू खालीद सिराजउद्दीन खान (२०), मो. मुशाहिद उल इस्लाम (२३), मो. सर्फराज उर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (२०), जमान नवाब खुटेउपाड (३२), सलमान सिराजउद्दीन खान (२८), फहाज शेख (२८), मोहसीन सिराजउद्दीन (३२) यांच्यासह अल्पवयीन मुलावर कारवाई केली.
अल्पवयीन अतिरेक्याने दहावीत मिळवले ८० टक्के गुण
राज्य दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारा अल्पवयीन मुलगा दहावीत ८० टक्क्यांनी उत्तीर्ण झाला होता. त्याच्याच मदतीने ही टोळी अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने कटाला दिशा देत असल्याचे एटीएसच्या चौकशीत उघड झाले. अल्पवयीन अतिरेकी हा अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. इसिससोबत थेट संपर्कात असलेल्या मोहसीनने त्याला जवळ केले. त्याच्याच आधारे तो परदेशातील इसिसच्या म्होरक्यांसोबत संपर्कात असल्याचे समोर आले. एटीएसने अल्पवयीन मुलासह ९ जणांवर कारवाई केली. तसेच या प्रकरणी मोहसीनचा भाऊ कुर्ला येथील एका क्लबमध्ये प्रशिक्षक असल्याचे समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here