आजरा – चंदगड तालुक्यातील ह्त्तीग्रस्त गावातून कालबद्ध एकात्मिक कार्यक्रम राबविणार – आदित्य रेडेकर

हत्तीसोबत संघर्ष कमी करण्यासाठी रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचा पुढाकार

0

आजरा – मानव आणि हत्ती यांच्यामधले संबध बिघडण्यास कारणीभूत होणारे परिसर असुंतलन आणि त्या बिघडलेल्या संबंधाना पूर्वस्थितीवर आणण्यासाठी दीर्घकालीन उपायाची गरज आहे. यासाठी रमेशराव रेडेकर फाऊंडेशन पुढाकार घेईल असे फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर यांनी सांगितले.

रायवाडा-खानापूर ता.आजरा परिसरातील हत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकरी व वनरक्षक यांच्याशी त्यांनी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले पश्चिम घाटातील कोल्हापूर जिल्हा हा वनसंपदेने संपन्न आहे ही गौरवशाली बाब आहे. पण हत्तींच्या संचारामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तर  काही वेळा शेतकऱ्यांच्या  जीवाचे देखिल नुकसान होत आहे. यासाठी हत्तीव्याप्त क्षेत्राचा अभ्यास, हत्तीच्या स्थलांतराचा व पारिवारिक जीवनाचा अभ्यास, हत्तीच्या सवयी हालचाली यासंबंधी जनजागृती, विविध माध्यमातून लोकांना सतर्क करणे, पिडीत शेतकऱ्यांना सन्मानजनक आणि वेळेत नुकसान भरपाई मिळणे, वन्य जीव व्यवस्थापनामधून चर मारणे, सौर कुंपण, असे विविध उपक्रम हाती घेण्याची गरज आहे.

बंदीपूर नशनल पार्क कर्नाटक, कोईमतूर येथील अन्नामलाई पर्वत रांगांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. देशभरातील वन्यजीव अभ्यासक, हत्ती तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शेतकरी ,ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्था, वन विभाग, लोकप्रतिनिधी, महसूल विभाग आणि वन्यजीव आणि पर्यावरण प्रेमी यांनी एकत्र येऊन कालबद्ध कार्यक्रम अथवा प्रकल्पाची आखणी करणे गरजेचे आहे. दिवाळीपूर्वी या सर्वांच्या एकत्रित बैठका घेऊन लवकरच या संबंधी काम सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी वनरक्षक श्री पाटील, खानापूरचे उपसरपंच युवराज जाधव,रमेशराव रेडेकर फाऊंडेशनचे पदाधिकारी व शेतकरी धनाजी डोंगरे,प्रकाश दोरूगडे,बाळू जाधव,विष्णू जाधव,नारायण कालेकर,रमेश पाटील,बाबू डोंगरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here