उत्तूर : बहिरेवाडीजवळ दुचाकी व इनोव्हा कारच्या गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले असून त्यातील दोघे गंभीर जखमी आहेत. मारुती विठ्ठल याड्रावी (वय २०), शंकर सिद्राम सौदते (वय २०, दोघे रा. रायबाग) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर इनोव्हा चालक मिनल अनिलकुमार श्रीवास्तव (वय ४६, रा. नवी मुंबई) हे किरकोळ जखमी झाले.
आर्दाळ येथे बकरी घेऊन आलेले धनगर बांधव मारुती याड्रावी व शंकर सौदते हे कामासाठी दुचाकी घेऊन निपाणी येथे गेले होते. रात्री ते निपाणीकडून आर्दाळकडे येत होते. तर याचवेळी आजऱ्याकडून मुंबईच्या दिशेने इनोव्हा कार निघाली होती. बहिरेवाडीजवळ दुचाकी व इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. यामध्ये मारुती याड्रावी याचा डावा हात व उजव्या पायाला दुखापत झाली आहे. तर शंकर सौदते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी बेळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास उत्तूर पोलीस दूर क्षेत्राचे सहाय्यक फौजदार पी.बी. दोरुगडे करीत आहेत.