आजऱ्यात स्वच्छता मोहीम गतिमान : उपनगराध्यक्ष आलम नाईकवडे

नियोजनबद्ध आराखड्यानुसार कर्मचारी कार्यरत, प्रबोधनात्मक कार्यावरही भर

0

आजरा (प्रतिनिधी) :
आजरा नगरपंचायतीच्यावतीने आरोग्यदृष्टया शहरातील कचरा समस्या आता राहिली नसून आरोग्य सभापती व उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे हे स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवत आहेत. शहराची स्वच्छता करण्यासाठी आजरा नगरपंचायतीच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी योग्य नियोजनाने स्वच्छतेचे काम करत आहेत, अशी माहिती नाईकवाडे यांनी दिली.
आजरा शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिल्याने रोजच्या रोज कचरा उचलला जात असून त्याची योग्य त्या ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे. यामध्ये नगराध्यकक्षा ज्योस्ना चराटी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी आजरा शहराचा ध्यास घेतला आहे. शहरातील कचऱ्याची निर्गत व्हावी, यासाठी नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत कचरा उचलण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर आजरा शहरातील विहिरी, दर्शनी कठडे, भिंती या ठिकाणाची स्वच्छता, रंगकाम करून नागरिकांना स्वच्छतेचे संदेश देण्यात आले आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी नगरसेवक स्वच्छ व सुंदर आजरा शहराच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. स्थानिक नगरपंचायत पातळीवर उपलब्ध निधीतून ही मोहीम राबवली जात आहे. पण या मोहिमेसाठी उपकरणे व अन्य साधनांसाठी आर्थिक निधी कमी पडत आहे. नियमितपणे कचरा उचलण्यासाठी सध्या नगरपंचायतीला घंटागाड्यांची अत्यंत आवश्यकता आहे. आजरा नगरपंचायतीकडून सध्या भाड्याने घंटागाडी घेऊन कचरा उचललं जात आहे. पण या घंटागाड्यांकडून अपेक्षेप्रमाणे काम होत आहे. कचरा उठाव करण्यासाठी या दोन घंटागाड्या अपुऱ्या पडत आहेत. यासाठी नगरपंचायतीला किमान दोन घंटागाडी मिळाव्यात या मागणीसाठी सर्व नगरसेवक शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत. मात्र शासकीय पातळीवर त्याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
शहरात स्वच्छतेबाबतच्या अभियानाला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान यशस्वी ठरले, असा विश्वास नगराध्यक्ष ज्योस्ना चराटी तसेच उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी व्यक्त केला आहे. पण यासाठी शासनाने नगरपंचायतीच्या आवश्यक बाबींकडे गांभीर्याने पहिले पाहिजे, असा सूर नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here