आघाडी किंवा युतीत जाणार नाही : नारायण राणे

0

मुंबई (प्रतिनिधी) :

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढेल अशी घोषणा पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांनी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी रंगशारदा येथे पार पडला. यावेळी त्यांनी स्वाभिमान स्वबळावर निवडणूक लढवेल अशी घोषणा करतानाच आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असेही जाहीर केले. याचवेळी ‘आघाडीत किंवा युतीत जाणार नाही’ असं नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना स्पष्ट केलं. स्वबळावरच काही जागा लढवणार असल्याचं राणे यांनी सांगितलं. तसंच, ‘युतीत माझ्या नावाची काहींना कावीळ झाली आहे’ असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना राणे यांनी आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे जाहीर केले. ही घोषणा केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जोरदार घोषणा दिल्या. यानंतर बोलताना ‘जवान शहीद झाल्यानंतर देश स्तब्ध झाला असताना सत्ता आणि स्वार्थाच्या तडजोडीसाठी युतीच्या बैठका सुरू होत्या’ अशा शब्दात नारायण राणे यांनी मुंबई गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवरही टीका केली. “पुलवामाची घटना घडल्यानंतर सर्व देश स्तब्ध झाला होता. मात्र तरीही काही लोकांनी युतीसाठी बैठका घेतल्या. या बैठका कशासाठी झाल्या तर सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी. महाराष्ट्रात आघाड्या आणि युत्या होत आहेत. त्याचे कारण यांच्याकडे लोकसभा आणि विधानसभेसाठी उमेदवार नाहीत.”, अशी टीका राणे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here