धैर्यशील माने यांनी कामाला लागावे -आदित्य ठाकरे : लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महत्त्वाच्या

कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असून, कोणत्याही परिस्थितीत येथून शिवसेनेचे खासदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी ताकदीने बाहेर पडा, अशी स्पष्ट सूचना

0

कोल्हापूर : कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागा आमच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असून, कोणत्याही परिस्थितीत येथून शिवसेनेचे खासदार निवडून आले पाहिजे, त्यासाठी ताकदीने बाहेर पडा, अशी स्पष्ट सूचना युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना दिल्या.

आदित्य ठाकरे मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. सायंकाळी शिवसेनेचे हातकणंगले लोकसभेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी माने कुटुंबीयांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले व त्यांचा सत्कार करण्यात आला. ठाकरे, धैर्यशील माने व माजी खासदार निवेदिता माने यांची १0 मिनिटे चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेतला. येथे तीन आमदार शिवसेनेचे असून, इतर मतदारसंघात कोठे पॅचवर्क करायचे ते सांगा, ‘मातोश्री’वरून ते केले जाईल. तुम्ही ताकदीने बाहेर पडा, लागेल ती मदत देऊ.

यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक श्रेणीक घोडावत, मुरलीधर जाधव, वेदांतिका धैर्यशील माने, निहारिका सत्वशील माने, राहुल चव्हाण, बबलू मकानदार, आदी उपस्थित होते.

दरम्यान, राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजेश क्षीरसागर गाडीतच थांबले
दुर्गेश लिंग्रस यांनी उभा केलेल्या विरंगुळा केंद्राच्या उद्घाटनासाठी ठाकरे यांच्या वाहन ताफ्यातून आमदार राजेश क्षीरसागर तिथे आले; पण ताफ्यातून गाडी बाजूला घेऊन ते कार्यक्रमापासून दूर जाऊन थांबले. क्षीरसागर आणि लिंग्रस यांच्यतील मतभेद ठाकरे यांच्या समोरही कायम राहिल्याची चर्चा होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here