मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक जिल्ह्यात प्रशासन, मनपाच्या हलगर्जीपणामुळेच १८७ अर्भकांचा मृत्यू – चित्रा वाघ

0

कुपोषणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही

नाशिक शहर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असतांना त्यांच्या दत्तक शहरात शासन आणि प्रशासन यांच्या असमन्वयामुळे नवजात बालकांचा मृत्यू होतो, ही असंवेदनशील बाब असून शासन आणि प्रशासन यांची कुठलेही संवेदनशील काम करण्याची मानसिकता नसल्याचे चित्र असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले. त्यांनी आज नवजात अर्भक मृत्यू प्रकरणी नाशिक जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, विभागीय आयुक्त, महापौर व नाशिक महापलिका आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भक मृत्यूची घटना दुर्दैवी असून राज्यातील शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसतो. त्यांच्या हलगर्जीपणामुळे या बालकांचा मृत्यू झाला असून राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नांवर राज्य सरकारकडे एकही योजना नसल्याने कुपोषणाच्या मुद्यावर सरकार गंभीर नसल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार दीपिका चव्हाण, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, डॉ.भारती पवार, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, नगरसेविका सुषमा पगारे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, गेल्या पाच महिन्यात नाशिक जिल्हा रुग्णालयात १८७ बालकांचा मृत्यू झाला आहे. आजही केवळ १८ इन्क्युबेटर मध्ये ४३ नवजात बालके दाखल आहे. ही दुर्दैवी बाब असून जो पर्यत एखादा बळी जात नाही तो पर्यत शासनाला जाग येत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. त्यांनी आज नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, नाशिकच्या महापौर व महापलिका आयुक्त यांची भेट घेतली असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्हा रुग्णालयात कुंभमेळ्यात अधिकची नवीन इमारत बांधली आहे त्या इमारतीचा देखील कुठलाही उपयोग केला जात नसून केवळ परवानगी असतांना महापलिकेच्या नाकर्तेपणामुळे झाडे तोडली गेली नाही. तसेच नवीन कामासाठी आज २१ कोटींचा निधी मंजुर असून कामे केली जावू शकत नाही ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ झाडांच्या तोडण्यावरून कामे होऊ शकत नाही त्यामुळे निष्पाप मुलांचा बळी जातो ही अत्यंत असंवेदनशील असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्या पुढे म्हणल्या की, नवजात अर्भकांचा मृत्यू होण्यामागे कुपोषण हे देखील महत्वाचे कारण आहे. गर्भवती महिलांसाठी आहार योजना राबविण्यात सरकार अपयशी ठरत असून राज्याचा आदिवासी विभाग हाच मुळात कुपोषित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुपोषणासाठी सरकार कडून डॉ..पी.जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात आली मात्र केवळ २५ रुपयात आहार देणे शक्य नसल्याने आज अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहे. त्यामुळे ही योजना देखील बंद पडली आहे. त्यांच्या प्रश्नांवर देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकार केवळ सीएसआय निधीवर कुपोषण मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. कुपोषण मुक्तीसाठी सरकारकडे कुठलीही ठोस योजना नसल्याने राज्यात कुपोषणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुपोषण हा सामाजिक मुद्दा असून तो सामाजिक बांधिलकीतून सुटणे आवश्यक आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here