सी डिव्हिजनमधील १४२० फुटबॉलपटूंचे नुकसान

0

 

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने फुटबॉल सामन्यांना स्थगिती दिल्याने सी डिव्हिजनमधील ७२ संघातील १४२० खेळाडूंचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थगिती उठवून केएसएने सी डिव्हिजनमधील सामने पावसाळ्यापूर्वी संपवावेत, अशी मागणी होत आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यानंतर मैदानाबाहेर मोठा राडा झाला. अनेक वाहनांचे नुकसान झाले. आठ ते दहा खेळाडू व प्रेक्षक जखमी झाले. पोलिसांनी दिलबहारचा नायजेरियन खेळाडू इचिबेरीसह आठ हुल्लडबाजांना अटक केली आहे. या घटनेनंतर केएसएने फुटबॉल सामन्यांना स्थगिती दिली आहे.

केएसएने स्थगिती न उठवल्याने सी डिव्हिजनमधील स्पर्धा झालेली नाही. या डिव्हिजनमध्ये ७२ संघ असून १४२० खेळाडूंची नोंदणी आहे. शहर, उपनगरे, ग्रामीण भागातील संघांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक खेळाडूच्या रजिस्ट्रेशनसाठी २५० रुपये भरले आहेत. तसेच कीट, बूट यांचा खर्च धरला तर प्रत्येक संघाला अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला आहे. केएसए ए डिव्हिजनमधील सामने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु झाले. ही स्पर्धा अंतिम टप्प्यात सुरु असताना बी डिव्हिजन स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात दोन संघात झालेल्या वादात स्पर्धा बंद पडली आहे. स्पर्धेबाबत गेली तीन महिने केएसएने निर्णय प्रलंबित ठेवला आहे. मार्च महिन्यात सी डिव्हिजनची स्पर्धा सुरु होते. पण केएसएने सामन्यांना स्थगिती दिल्याने सी डिव्हिजनची स्पर्धा झालेली नाही. त्यामुळे संघाचा सराव पाण्यात जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

१० ते १५ जून पूर्वी ए, बी,सी डिव्हिजनमधील स्पर्धा पूर्ण होणे बंधनकारक आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसास सुरुवात होण्याची शक्यता असते. पण केएसएने सी डिव्हिजनबाबत कोणतीच हालचाल न केल्याने १४२० खेळाडूंचे नुकसान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here