“व्यर्थ न हो बलिदान,वेदात दौडले वीर सात…..” गारगोटी स्वातंत्र्य लढा -१९४२

0

गडहिंग्लज – “जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले,
सोडिले सर्व घरदार,त्यागिला मधुर संसार,
ज्योतिसम जीवन जगले,अमर हुतात्मा ते झाले” या कवी वि.म.कुलकर्णी यांच्या कवितेच्या ओळी कानी पडताच डोळ्यातून अश्रू ओघळले आणि मग मन भूतकाळात गेले.
१२ डिसेंबर १९४२ चा लढा म्हणजे भारतीय जनतेने इंग्रजांना दिलेला अंतिम टोला. याचेच एक घोतक म्हणजे गारगोटी कचेरीवर केलेला हल्ला म्हणजे हा स्वातंत्र्य लढ्याचा अद्वितीय आदर्श आहे.या हल्ल्यात आपल्या ७ वीरांनी आत्महुती दिली. हा दिवस कलनाकवाडी,सेनापती कापशी,मुरगुड,नानीबाई चिखली,खडकलात, जत्राट या भागात हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
वीर भगतसिंग म्हणतात,” बुद्धिमान मानस” ज्यांना वेडी पोर ,वाट चुकलेले म्हणतात,खऱ्या अर्थाने तीच धडपडणारी माणसे क्रांत्या करतात.
आणि अशी सात क्रांतिकारक थोर पुरुष कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्यातील अंतिम पर्वात “गारगोटी कचेरीवरील हल्ल्यात” आपले सर्वस्व अर्पण केले.त्यांचे उत्तुंग असलेले सर्मपण स्वातंत्र्यपूर्वी व स्वातंत्र्यानंतरही दखल घेतली गेली नाही.केवढी मोठी शोकांतिका आहे ना !!! या सात हुतात्म्यांच्या बलिदानाची फार हेळसांड झाली. सुवर्णाक्षरांनी त्यांची नावे इतिहासात कोरली गेली पाहिजे होती.अशा प्रकारे त्यांचे दुसऱ्यांसाठी बलिदान आणि हे बलिदान कलयुगातील जागृत जनता व्यर्थ जाऊ देणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
“परंपरा ही शूर वीरांची,नररत्नांची खान,इथे निपजले राजे योद्धे,मुत्सद्दी विद्वान” हे ब्रीद सत्य केले.
कोण होते हे नररत्न? कोण होते हे महापुरुष ?
पाहिले होते ते हु. करवीरप्पा स्वामी – आचार,विचारांचा सुवर्णमध्य साधणारे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर या गावी १९१३ मध्ये त्यांचा जन्म झाला. सातवी पर्यंत शिक्षण झालेल्या स्वामींच्यावर गांधीजींच्या विचारांचा पगडा होता.म्हणूनच रक्ताच्या थारोळ्यात शेवटची घटका मोजताना त्यांचे धीर गंभीर उदगार, “माझ्या रक्ताची शपथ,पोलिसांना मारू नका,जरी ते ब्रिटिशांचे गुलाम असले तरी ते माझे देशबांधव आहेत”.
यातील दुसरे हुतात्मा नारायण वारके हे भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी या गावचे असून १ ऑगस्ट १९४२ ला खासबाग मैदानात माधवराव बागल, प्रा.ना.सी.फडके यांची भाषणे ऐकून ग्रामीण भागातील युवकांच्या मनात प्रेरणा भरण्यासाठी वेदगंगा,दूधगंगा खोऱ्यात झाडांच्या मुळासारखी चळवळ पसरवली. हु.वारके यांनी स्वातंत्र्यलढ्यात देश आणि धर्म सुरक्षिततेसाठी बलिदान देताना शिवपुत्र संभाजीराजेंची प्रखरतेने आठवण येते.
तिसरे होते ते हु मलप्पा चौगुले कागल तालुक्यातील नानीबाई चिखली या जन्मभूमितील. स्वामींच्या गनिमी पथकात सहभागी होऊन ते या लढ्यातील सन्मानबिंदू बनले. खजिन्यावर झडप घालताना पोलिसांच्या चकमकीत ते आजरामर ठरले. आणि त्यांचे ते शेवटचे उदगार “दादा आता आम्ही जाणारच आहोत, हरी बेनाडेंना सांगा की आता आमचे अधुरे स्वप्न पूर्ण करावे”.वयाच्या १८व्या वर्षी ते हुतात्मा झाले.
चौथे होते ते कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावातील हु.शंकरराव इंगळे. हल्ल्याचा बेत निश्चित झाल्यावर इंगळे घरी आले आणि आईला म्हणाले,”आई ज तू मला आंघोळ घाल,जेवायला घाल,आता तुम्ही मला विसरून जावा,मी चाललो,मला आशीर्वाद दे”,नंतर ते बाहेर आले आणि गरगोटीच्या संग्रामात हुतात्मा झाले.
पाचवे होते ते कागल तालुक्यातील मुरगुड गावचे हु.तुकाराम भारमल…”मित्रा अरे कसले जेवण घेऊन बसलास,आम्हाला भूक लागली आहे ती फक्त स्वातंत्र्याची,मुक्तीची”. असे क्रांती उदगार काढणारे भारमल यांनी वयाच्या २०व्या वर्षी स्वतःस क्रांतीपर्वात झोकून दिले.
या नंतर सहावे होते ते खडकलाट (ता.चिकोडी) येथील हुतात्मा परशुराम साळुंखे यांनी वयाच्या १८व्या वर्षी स्वामी,वारके यांच्यासोबत पाल गुहेत खजिन्याचे दार फोडताना बंदुकीच्या गोळीचा बळी गेले व जनता अजून एका हिऱ्यास मुकली.
सातवे क्रांतिकारक होते ते निपणीपासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या जत्राट (ता.चिकोडी) गावचे हु.बळवंत जबडे.”माझी कातडी काढणारा अजून जन्माला याचा आहे असे सडेतोड व प्रत्युत्तर धमकी देणाऱ्या गावच्या पाटलाचे तोंडच बंद केले”.
म्हणूनच म्हणावेसे वाटते की “नाव छोडके जाती है अपने पीछे पाणी पर एक एक लकीर क्षणिक अस्तित्व की,हम भी छोड जाते है अपने पीछे कुछ कदमो के निशाण”.

असे हे कोहिनुर हिरे १२ डिसेंबर १९४२ रोजी रात्री हुतात्मा झालेल्या या ७ जणांची लोक लढ्याची आखणी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली, गोपाळराव वाकरे यांच्या सहकार्याने झाली.यांचा उद्देश होता की कचेरीतील राजबंदयाना मुक्त करायचे व गरगोटीच्या कचेरीतील खजाना म्हणून कस्टडीत ठेवलेली भुदरगड पेठ्यातील शेतसारा,गावदंडाची रक्कम,शस्त्रात्रे हस्तगत करायची.गारगोटी कचेरीवर हल्ला करण्यापूर्वी ब्रिटिश सत्तेची कोल्हापूरहून गरगोटीकडे येणारी दळणवळण ठप्प करायची म्हणून ११ डिसेंबर रोजी रात्री वेदगंगा नदीवरील कुर येथील पुल डायनामाईट ने उडवायचा म्हणून आखणी केली.पण हा प्रयत्न असफल झाल्याने त्यांनी पाल येथील गुहेचा वापर केला.त्यानुसार त्यांनी गडहिंग्लज,मुरगुड,निपाणी, कापशी,खडकलाट, संकेश्वर असे गट करून त्यानुसार कामाची विभागणी केली.पोलिसांच्या ससेमिर्यांच्या बचावपासून भूमिगत राहून एकमेकांना टोपण नावे बहाल केली.
या लढ्यात कोल्हापूर संस्थानाचा पश्चिम भागातील १० क्रांतिकारकांचा उत्कृष्ठ सहभाग होता.तसेच पाल गावच्या सरजा भोसले या महिलेचाही सिंहाचा वाटा होता पण तिची शासन दरबारी कुठेच नोंद नाही.किती हे दुर्दैव….
सर्व क्रांतिकारकांनी इंदूबाई मंदिरात देवीचे दर्शन घेऊन स्वामींनी पहिल्यांदा कचेरीच्या गार्डवर हल्ला केला पण यात स्वामी धारातीर्थी पडले.यानंतर पोलिसांच्या चकमकीत एकेकजन हुतात्मा होऊ लागले.क्रांतीवीर हरिबा बेनाडे यांचा जिवलग मित्र यांनी पुढे आपल्या मित्रांच्या मृत्य चा बदला ७०० पोलिसांशी झुंज देऊन ७ एप्रिल १९४४ रोजी आत्मबलिदान दिले.
देशासाठी आत्मबलिदान दिलेल्या या ७ हुतात्माची प्रेते त्यांच्या कुटुंबियांना न देता पंचगंगेच्या घाटात बेवारस म्हणून परस्पर दहन करण्यात आली.ब्रिटिश सत्तेचा हा असा क्रूर खेळ…
या सात जणांच्या हुतात्म्यांचे गारगोटी हे गाव हिंदुस्थानातील क्रांतीचे स्फूर्तिस्थान बनले.म्हणूनच इतिहासाला १९४२ च्या क्रांतीचे स्वराज्याचे मानकरी म्हणून पहिला मान गारगोटीला मिळाला.
सध्या गारगोटीत या ७ हुतात्म्यांचे संयुक्तिक हुतात्मा स्मारक इमारतीच्या स्वरूपात शासनाने उभे केले आहे.तसेच त्यांच्या कार्याची स्मृती म्हणून डोळे दिपवणारी भव्य अशी क्रांतीज्योतीचे प्रतिकात्मक रूप लढ्याचे सैननी देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या शुभ हस्ते गरगोटीच्या कचेरीसमोर स्थापित केले आहे.आजही त्या ठिकाणी पाय टाकताच मन अंतकरणापासून या वीरांच्या कर्तृत्वाविषयी झुकते व त्याना अभिमानाने सलाम करते.
“वेडात दौडले वीर सात”,या शिवकालीन संग्रामाचे स्मरण होऊन वेदगंगेच्या काठावर विराजमान असलेल्या गारगोटी या लहानश्या गावची भूमी ४२व्या क्रांतीचे स्फूर्तिस्थान ठरते. म्हणूनच म्हणावेसे वाटते “तुमच्या युद्धाचा होम पवित्र आहे,सारी जनता ते रणकुंड धगधगत ठेवील व स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासात एक आपण अपरिवार्य पात्र राहू”.
अशा या वीररत्नाना कोटी कोटी त्रिवार अभिवादन!!

शब्दांकन
प्रा.सुषमा पाटील (गडहिंग्लज)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here