डीपीडीसीमधून ग्रामीण रस्त्यांसाठी 10 कोटी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

42 टक्के निधी खर्च झाल्याने नाराजी
विकासाचा संपूर्ण निधी खर्च करण्याची यंत्रणांची जबाबदारी
पुढील वर्षासाठीच्या 365 कोटीचा अराखडा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये माहे नोव्हेंबर अखेर जिल्हा सर्वसाधारण योजनेअंतर्गत 80 कोटी निधी, विशेष घटक योजनेअंतर्गत 20 कोटी तर ओटीएसपी अंतर्गत 43 लाख रुपये खर्च झाले असून उपलब्ध निधीच्या तुलनेत खर्चाची टक्केवारी कमी असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व यंत्रणांनी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी उपलब्ध झालेला निधी 100 टक्के खर्च करावा, असे सांगून ग्रामीण रस्त्यांमधील खराब रस्त्यांची दुरुस्ती, त्यावरील खड्डे भरणे आणि सिलिकोट या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधील 10 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. या बैठकीत सन 2018-19 या वर्षासाठी एकूण 364 कोटी 83 लाखाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मान्यता दिली.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके, डॉ.सुजित मिणचेकर, सत्यजीत पाटील, अमल महाडिक, उल्हास पाटील, श्रीमती संध्यादेवी कुपेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वर्षी जिल्हा सर्वसाधारण योजनेअंतर्गत 249.22 कोटीचा निधी अर्थसंकल्पीत झाला असून 30 टक्के महसूल व 20 टक्के भांडवली कपाती नंतर सुधारित तरतूद 190 कोटी रुपयांची उपलब्ध आहे. यापैकी 80 कोटी 36 लाख म्हणजे 42 टक्के निधी खर्च झाला आहे. तर विशेष घटक योजनेअंतर्गत 110 कोटी मधील केवळ 20 कोटी म्हणजे 18 टक्के निधी खर्च झाला आहे. तर ओटीएसपी अंतर्गत 1 कोटी 90 लाखांत कपात होऊन 1 कोटी 33 लाखांची सुधारित तरतूद आहे. यापैकी 43 लाख 30 हजार इतका निधी खर्च झाला आहे.

नोव्हेंबर अखेर यंत्रणांचा खर्च अत्यंत कमी झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करुन नियमांचे पूर्णत: पालन करुन जिल्ह्याच्या विकासासाठी आलेला निधी संपूर्ण खर्च करण्याची यंत्रणांची जबाबदारी आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणाशी बांधिलकी जपली पाहिजे, आपल्या कार्यक्षेत्राच्या विकासाला प्राध्यान्य दिले पाहिजे असे सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध योजनांची माहिती करुन घ्यावी व तळगाळातील घटकापर्यंत त्या पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा असेही स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेकडील सुमारे 5800 किमी रस्त्यापैकी 3300 किमी रस्ते खराब आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी केली यावर आजच्या झालेल्या बैठकीत खराब रस्त्यांवरील खड्डे भरणे व सिलिकोट करणे या कामासाठी जिल्हा वार्षिक सार्वसाधारण योजनेअंतर्गत होणाऱ्या बचतीमधून 10 कोटींचा निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करत असताना ज्या वाड्यावस्त्यांवर अद्यापही विद्युत जोडणी झालेली नाही अशा सात वाड्यावस्त्यांवर महावितरणने तात्काळ विद्युत जोडण्या कराव्यात ज्या ठिकाणी अडचण असेल तेथे सौरऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करुन द्यावी व तेथील अंधार दूर करावा. साकव बांधकामासाठीही 15 कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे, असे सांगून ज्या वाडीवस्त्या रस्त्याने जोडल्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते खडीकरण करण्यात येईल. त्यासाठी वन विभागाने आवश्यक ती मदत करावी, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन आकर्षने वाढविण्यामध्ये पन्हाळा येथील लाईट अँड साऊंड शो साठी विविध विभागांकडील परवान्यांसाठी व्यक्तीश: पाठपुरावा करावा व मार्चपर्यंत काम पूर्ण करावे अशा सूचना दिल्या.

जिल्हा परिषद व महानगरपालिका या यंत्रणा मोठ्या असून त्याचेही खर्चाचे ताळमेळ घेणे आवश्यक असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वच यंत्रणांनी गतवर्षात विविध योजनांमधून केलेल्या कामांची तपासणी करणार असल्याचे सांगितले. तालुकास्तरावर असणारे बचत भवन या माहिला बचत गटांसाठी असणारी सात बाजार विक्री केंद्रे पुर्ण क्षमतेने मार्च पर्यंत कार्यन्वीत होतील. जिल्हा परिषदेच्या सुमारे 900 शाळांची येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती केली जाईल. कुरुंदवाड आणि इचलकरंजी नगपालिकांना नाविन्यपूर्ण मधून फायर फायटर बुलेट उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याचे व्हिजन 2022 फेब्रुवारी अखेर राज्याकडे सादर करण्यात येणार आहे. प्रत्येक विभागाने लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन आपआपले प्रस्ताव तयार करावे अशा सूचनाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत सन 2017-18 च्या पुनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. या बैठकीत कृषी, पाणीपुरवठा, ऊर्जा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, अनुसूचित जाती घटकांसाठीच्या योजना आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमणार, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here